मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ जुलै रोजी मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जात आहे. या जुळ्या बोगद्याच्या भूमिपूजनामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.

लोकसभेची निवडणूक पार पडली असून आता विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. सप्टेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणावर विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ जुलै रोजी मुंबईत येणार असून यावेळी महानगरपालिकेच्या काही कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगांव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>Hit and Run: मिहीर शाह याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा सवाल, “रक्ताच्या नमुन्यांत ६० तासांनी पोलीस…”

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ – चेंबूर, अंधेरी – घाटकोपर, जोगेश्वरी – विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्यांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने चौथा पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी महानगरपालिकेने गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे गोरेगाव – मुलुंड अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य होणार आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकल्पाची मांडणी चार टप्प्यांत करण्यात आली आहे. त्यापैकी तिसऱ्या टप्प्यांतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमधील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी जे कुमार – एनसीसी यांना कंत्राट देण्यात आले आहे. प्रत्येकी तीन मार्गिका असणाऱ्या या जुळ्या बोगद्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण बोगदा साकारण्याचा कालावधी एकूण ६० महिन्यांचा म्हणजेच ५ वर्षांचा अपेक्षित आहे. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ हा संपूर्ण बोगदा असल्यामुळे यात स्फोटके वापरता येणार नाहीत, तर अत्याधुनिक टनेल बोअरिंग यंत्राच्या (टीबीएम) माध्यमातून तो खणला जाणार आहे.

एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटर व्यासाचे असतील. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात त्यांचा अंतर्गत व्यास १३ मीटरचा असेल. हा बोगदा अभयारण्याच्या डोंगराखाली २० ते १६० मीटर खोलीवरून खणला जाणार आहे. आरे व राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या या मार्गासाठी कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही. त्यामुळे भांडवली खर्चात बचत होणार आहे.