तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून पाचव्या टप्प्यात आता मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी १२-१३ दिवसांचा अवधी उरला असून मुंबईत प्रचारांना वेग आलाय. दरम्यान, मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ आणि १७ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महत्त्वाची माहिती अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क येथील नियोजित सभेत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र दिसण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या हवाल्याने दि हिंदूने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे सभा घेण्याकरता विविध पक्षाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज आलेले आहेत. तसंच, १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज केले आहेत. या अर्जांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, राजकीय कुरघोडीतून सभेसाठी ठाकरे गटाला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर, भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार शिवाजी पार्कमध्ये १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या सभेला राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी करणार घाटकोपर ते मुलुंड दौरा
नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. जिथं विद्यमान खासदार मनोज कोटक यांना तिकिट नाकारून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. मिहिर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे. त्यामुळे या रोड शोचा फायदा मिहिर कोटेचा यांना होऊ शकतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उमेदवाराला गुजरातीबहुल भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, ज्याचा वापर ठाकरे गटाकडून केला जात आहे.
मुलुंड येथे हॅलिपॅड बनवण्यात येणार असून मोदींचं हेलिकॉप्टर इथं थांबेल आणि इथून एलबीएस मार्गाने ते घाटकोपरला पोहोचतील, असंही सूत्रांच्या हवाल्याने दि हिंदूने त्यांच्या वृत्तांत म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि मोदी दिसणार एकाच व्यासपीठावर
महायुतीची शेवटची सभा १७ मे रोजी शिवाजी पार्कवर होणार आहे. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. तसंच, राज ठाकरे भाजपाच्या सभेत सामील होतील, असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.