माझगाव येथील प्रिन्स अली रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली असून साधारण ७५ वर्षे जुनी ही इमारत मोडकळीस आल्यामुळे उपचारासाठी नवीन रुग्णांना प्रवेश देणे तातडीने बंद करण्यात आले आहे. तसेच शस्त्रक्रिया विभागही बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा – २५ वर्षांची मुंबईची सत्ता टिकविण्याचे शिवसेनेपुढे कडवे आव्हान
माझगाव येथील प्रिन्स अली खान हे खाजगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले होते. इमारतीच्या संरचनात्मक तपासणीच्या अहवालात इमारत धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संस्थेने रुग्णालयातील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नवीन रुग्ण दाखल करण्यात येणार नसल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णालयाची मुख्य इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे सध्या केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या वतीने इमारतीची आणखी एकदा संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबई : भविष्यात मोटरमन, गार्डवर कॅमेऱ्याची करडी नजर ; लोकलच्या मोटरमन केबीनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार
जुन्या इमारतीत १५० खाटांचे रुग्णालय असून दरवर्षी साधारण दीडलाख बाह्यरुग्ण व नऊ हजार आंतररुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णालयात सध्या ५० रुग्ण असून या रुग्णांना जवळच्या रुग्णालतात हलवण्यात येणार आहे. त्याकरिता संस्थेच्या वतीने परिसरातील रुग्णालयांशी संपर्क साधण्यात येत आहे.