शिक्षण सेवक महिलेची सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणारा भिवंडी येथील मुख्याध्यापक आणि दोन कारकुनांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये स्वीकारताना हे त्रिकूट जाळ्यात अडकले.
भिवंडी येथील समदिया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मोमीन जुबेर उस्मान (४३), वरिष्ठ लिपीक मोमीन खावर आणि कनिष्ठ लिपीक नदिम अहमद अशी आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापकांच्या दालनातच ही कारवाई केली. सहाय्यक शिक्षक पदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एका शिक्षण सेवक महिलेकडून मुख्याध्यापक आणि कारकुनांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Story img Loader