मुंबईतील मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर नवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला वेग आला असून उद्या होणाऱ्या सिडको संचालक बैठकीत मेट्रोच्या कामासाठी मोठय़ा निधीची तरतूद केली जाणार असल्याचे समजते. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा शुभारंभ दोन वर्षांपूर्वी झाला असून बेलापूर ते खांदेश्वर या ११ किलोमीटर अंतराच्या कामातील ६६ टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून येते.
या प्रकल्पाचा शुभारंभ दोन वर्षांपूर्वी एक मे रोजी झाला असून सध्या बेलापूर ते पेंदार या मार्गातील ६६ खांबांचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय ११ स्टेशनपैकी १० स्टेशन बांधणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे  डिसेंबर २०१४ रोजी ही मेट्रो धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे पण रोलिंग आणि इतर सिस्टिम कामामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण होण्यास मे २०१५ उघडणार असल्याचे अभियंत्याचे मत आहे. बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर अंतराच्या मार्गावर  दोन हजार १२० कोटी रुपये खर्च होणार असून त्यासाठी उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील मेट्रोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदील दिल्याने दिघा- बेलापूर, वाशी- महापे, बेलापूर-खांदेश्वर या नवी मुंबई पालिका क्षेत्रातील मार्गाचाही मार्ग मोकळा झाला आहे.  सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नवीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया उद्या मांडणार आहेत. सिडकोची जमा ही निश्चित नसल्याने हा अर्थसंकल्प इतर संस्थासारखा काटेकोरपणे मांडला जात नसून नवीन प्रकल्पांना लागणाऱ्या निधीची केवळ तरतूद केली जात असल्याचे समजते. सिडकोची सुमारे सात हजार कोटी रुपये विविध वित्त संस्थांकडे ठेवी स्वरुपात पडून आहेत. मेट्रोच्या आसपास व्यापारी संकुल उभारुन सिडको या प्रकल्पाचा खर्च वसूल करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा