मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असून या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.
भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्यसाधारण स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा, ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करून ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा कारागृहात कैदेत ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिद्ध असा पुणे करार येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुद्धा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. सन १८९९ मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली.
शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टिकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमच ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील.
पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन मार्गदर्शक पुरविला जाईल. दररोज ५० पर्यटकांना भेटीची परवानगी देण्यात येणार आहे. ही योजना लवकरच राज्यातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.