ठाणे कारागृहाच्या आवारात पोलीस प्कर्मचाऱ्याला कच्च्या कैद्याने मारहाण केल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी घडला. वर्तकनगर पोलिसांनी एका गुन्ह्य़ामध्ये किरणकुमार स्वामी चेटियार (२२) व सुनील नानासाहेब केदार (२२) यांना अटक करून त्यांची रवानगी ठाणे कारागृहात केली होती. दरम्यान तारीख असल्याने ठाणे पोलीस मुख्यालयाची पोलीस पार्टी त्यांना गुरूवारी सकाळी न्यायालयात घेऊन गेली होती. या पोलीस पार्टीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल अतुल रमेश भोई यांच्यासह एक पोलीस उप निरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल होते. न्यायालयीन कामकाज आटपून कारागृहाच्या आवरात आले असता वडिलांना न्यायालयामध्ये भेटू न दिल्याचा राग धरून किरणने हुज्जत घालून अतुल यांना मारहाणही केली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.