शिर्डी घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न
वेगवेगळ्या गुन्ह्य़ांबद्दल शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची गुन्हेगारी मानसिकता बदलण्यासाठी राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये विपश्यना वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तुरुंगातून पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याने शिर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कैद्यांचे मानसिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणून विपश्यनेसारखे वर्ग सुरु करण्याची निकड जाणवू लागली आहे. त्यानुसार लवकरच असे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यात मुंबई, ठाणे, तळोजा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या ठिकाणी मध्यवर्ती कारागृहे आहेत. या तुरुंगांमध्ये विविध गुन्ह्य़ांखाली सुमारे २० हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. अशा कैद्यांची गुन्हेगारी मानसिकता बदलून त्यांना पुन्हा समाजात एक चांगला नागरीक म्हणून जगता यावे, यासाठी देशात पहिल्यांदा तिहार तुरुंगात विपश्यना वर्ग सुरु करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातही १९९८ मध्ये काही तुरुंगात असे वर्ग सुरु करण्यात आले होते, परंतु त्यात सातत्य राहिले नाही. गेल्या वर्षी पुन्हा मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांसाठी विपश्यना वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी कारागृहात विपश्यनेसाठी खास हॉल बांधण्याकरिता ६० लाख रुपये देण्यात आले होते. त्यापैकी नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूरमधील तुरुंगांमघ्ये हॉल बांधण्यात आले.
विपश्यना मात्र अपवादानेच एखाद्या कारागृहात केली जाते. परंतु त्यातही सातत्य नाही. आता सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये विपश्यना वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील त्यासाठी आग्रही आहेत. लवकर त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा