राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तुरुंगवास कायद्यात काही महत्वाचे बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले असून पॅरोलचा गैरवापर होऊ नये यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे ठरविले आहे.
पॅरोलच्या माध्यमातून कैद्याने घेतलेल्या दिवसांची सुट्टी त्याला अतिरिक्त शिक्षा म्हणून भोगावी लागले अशी तरतूद पॅरोलचा गैरवापर रोखण्यासाठी करण्याची गरज असल्याचे आर.आर.पाटील म्हणाले. कोणत्याही कैद्याला जास्तीत जास्त ९० दिवसांचा पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. संजय दत्तला वारंवार मिळणाऱया पॅरोलबाबत नियमांचे उल्लंघन केले गेल्याबद्दल बोलताना आर.आर.पाटील म्हणाले की, स्पष्टपणे सांगायचे झाले तर, पॅरोलबाबत कोणताही राजकारणी हस्तक्षेप करु शकत नाही. कायद्यातील तरतूदीनुसार डॉक्टरांनी एखाद्या कैद्याला प्रकृती ठीक नसल्याचे प्रमाणपत्र दिले तर, संबंधित कैद्याला पॅरोल द्यावाच लागतो. परंतु, याचा गैरवापर होत नाही ना याकडे लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे. असेही आर.आर.पाटील म्हणाले.
संजय दत्तच्या पॅरोलची न्यायालयाकडून खरडपट्टी!
कैद्याने पॅरोलच्या जोरावर मिळविलेली सुट्टी त्याला अतिरिक्त शिक्षा म्हणून अधिकृत शिक्षेच्या कालवधीनंतर भोगवी लागेल अशी तरतूद पॅरोलसुट्टीच्या नियमांत करण्यात येणार असल्याचेही गृहमंत्री म्हणाले. संजय दत्तला दिल्यागेलेल्या पॅरोलबाबत नियमांचा गैरवापर झाल्याचे विचारले असता आर.आर.पाटील यांनी यावर काही न बोलणेच पसंत केले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisoners on parole will have to serve additional term patil