माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अंतर्गत विषयांवर सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय. “आम्ही नाईलाजाने सोनिया गांधी यांना खासगी स्वरुपात पत्र लिहिलं होतं. मात्र, ते माध्यमात आणलं गेलं आणि त्याचा विपर्यास केला गेला,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. तसेच या पत्रानंतर सोनिया गांधी यांनी आम्हाला बोलावून पाच तास चर्चा केल्याचंही नमूद केलं. ते सोमवारी (२५ एप्रिल) लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आम्ही नाईलाजाने खासगी स्वरुपात सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. मात्र, ते माध्यमात आणलं गेलं आणि त्याचा विपर्यास केला गेला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी आम्हाला बोलावून ५ तास चर्चा केली. तसेच त्यांनी ५ राज्यांचे निकाल निराशाजनक असल्याचं मान्य केलं. असं असलं तरी देशात काँग्रेसला १८ टक्के मतं मिळतात हे आशादायक आहे. आज युवकांना जोडून घ्यायला काँग्रेस कमी पडली असावी. यासाठी आता चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलंय.”

“सक्षम विरोधी पक्ष नसल्याने नाईलाजाने लोकं भाजपाला मतदान करतात”

“काँग्रेसने भारताची संकल्पना उभी केली आणि ती जगाला पटवून दिली. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला भारतात पाश्चिमात्य लोकशाही टिकणार नाही अशी भाकितं केली. मात्र, भारतात लोकशाही रुजली याचं श्रेय काँग्रेसला जातं. सक्षम विरोधी पक्ष नसल्याने नाईलाजाने लोक भाजपाला मतदान करत आहेत. त्यामुळे यापुढील १२ विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हाला काम करायचं आहे. काँग्रेसचे काही निर्णय चुकलेत, पण ते दुरुस्त करून नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. सुशिक्षित युवक या कल्पनेला प्रतिसाद देतील,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

“प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबले, कारण…”

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, “प्रशांत किशोर राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांची कामाची वेगळी पद्धत आहे. ते मला येऊन भेटले आणि आम्ही प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सध्याच्या हुकुमशाही भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस हा पर्याय आहे, मात्र त्यासाठी पक्षांतर्गत काही बदल सुचवले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबल्याचंही सांगितलं. कारण त्यांच्या काही अटी होत्या आणि त्या पूर्ण होत नव्हत्या. मात्र, आता पुन्हा त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. आताही त्यांच्या त्याच अटी आहेत.”

“काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कोणीही बसावं, पण…”

“काँग्रेसमध्ये अनेकदा अंतर्गत समिती नेमण्यात आल्या. मात्र, त्या समितींच्या अहवालाचं पुढे काय झालं हे समजलं नाही. मध्यंतरी काही निर्णय फार तडकाफडकी घेण्यात आले. त्याचा परिणाम बघायला मिळाला. आमचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कोणीही बसावं, पण त्याने ती जबाबदारी घ्यावी. सध्या काँग्रेसमध्ये राहुल गांधींइतका लोकांमध्ये प्रसिद्ध चेहरा दुसरा कोणी नाही,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

“देशात ८० टक्के हिंदू, तरीही भाजपाला ४० टक्केच मतं”

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संविधानात सरकारला धर्म नसेल असं सांगण्यात आलंय. राज्यसंस्थेचा कोणताही धर्म नसेल ही शाश्वत कल्पना आहे. त्याचा मतांसाठी वापर होईल का? तर अजिबात नाही. त्यामुळे सेक्युलॅरिझमबाबत आम्हाला कोणीही हिनवलं, मुस्लीम लांगुलचालनाचा आरोप केला तरी आम्हाला हे मूल्य सोडून चालणार नाही. देशात ८० टक्के हिंदू आहेत, तरी भाजपाला ४० टक्केच मतं मिळतात. निम्मे हिंदू लोक भाजपाविरोधात मतदान करतात.”

“सध्या राजकारण फार खर्चिक झालंय”

“आपल्या देशातील लोकशाही सत्तेभोवती फिरणारी आहे. अजूनही आपण इलेक्शन फंडिंगचा मुद्दा सोडवलेला नाही. सध्या राजकारण फार खर्चिक झालंय. पश्चिम महाराष्ट्रात ज्यांच्याकडे साखर कारखाने वैगरे आहेत तेच निवडणूक लढू शकतात,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.