भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले असून, भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा देश ठरला. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी हा अभिमानास्पद मंगल क्षण आहे, अशी भावना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केली. त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.
भारताने मार्स ऑर्बिटर मिशन या नावाने ऑक्टोबर २०१३मध्ये पाठविलेल्या मंगळयानाने बुधवारी सकाळी मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला आणि नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मोहीम यशस्वी केली. याबद्दल आनंद व्यक्त करुन चव्हाण यांनी ही प्रतिक्रीया दिली. चव्हाण म्हणाले, भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली ही झेप कौतुकास्पद असून, यामागे शास्त्रज्ञांचे अथक कष्ट आणि बुद्धिमत्ता आहे. अशा मोहिमा या एक दोन दिवसांच्या नसतात, तर त्यासाठी वर्षानुवर्षे तयारी, नियोजन आणि अंमलबजावणी करावी लागते. म्हणूनच पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेली ही मोहिम भारताची प्रगती अधोरेखित करणारी ऐतिहासिक घटना आहे. आता ख-या अर्थाने यानाच्या कामगिरीला सुरुवात झाली आहे आणि नियोजनानुसार या मंगळयानाची सर्व कामगिरी अपेक्षेनुसार पार पडेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा