पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांनी शनिवारी स्वीकारला. त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले आहे.
सोकावलेल्या बिल्डर लॉबीला चाप, सत्तेतील भागीदार असलेल्या राष्ट्रवादीला वेसण यांसह अनेक धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणारे त्याचबरोबर कासवछाप निर्णयप्रक्रियेमुळे विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांच्याही टीकेचे धनी बनलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी अखेरीस राजकीय अपरिहार्यतेपोटी पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर काडीमोड घेतानाच सरकारचा पाठिंबाही काढून घेतला, त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. निवडणुकीच्या तोंडावर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांच्याकडे पदभार कायम ठेवला जाण्याची अजिबात शक्यता नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच सरकार अल्पमतात गेल्याने राज्यात अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे करण्याची शक्यता आहे.
महायुतीत फूट पडल्यानंतर काँग्रेस आघाडीदेखील फुटल्याने एका दिवसात राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरकार अल्पमतात गेल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपालांशी विद्यमान राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. सरकारचा पाठिंबा काढून घेणारे राष्ट्रवादीचे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले. सरकार अल्पमतात गेल्याने राजीनामा द्यावा, असे राज्यपालांनी सूचित केल्याचे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचा इन्कार केला. मुख्यमंत्र्यांनी स्वत:हूनच राजीनामा दिल्याचा दावा त्यांच्या कार्यालयातर्फे करण्यात आला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत
’मुंबई किंवा अन्य मोठय़ा शहरांमध्ये बिल्डरांच्या फायद्याचे निर्णय मंत्रालयातून घेतले जाण्याची परंपरा पडली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी बिल्डर लॉबीला पहिला झटका दिला.
’राष्ट्रवादीच्या दादागिरीचा चाप लावला. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करणे आणि सिंचन घोटाळ्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीची कोंडी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा