वांद्रे येथे झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रीती राठी हिच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचे एक वेगळे उदाहरण घालून दिले आहे. राज्य सरकारने दिलेले दोन लाख रुपये तिच्या कुटुंबियांनी ‘स्टॉप अ‍ॅसिड अ‍ॅटॅक’ संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रीती २ मे रोजी दिल्लीहून मुंबईला नौदलात परिचारिका होण्यासाठी आली होती. मात्र वांद्रे स्थानकात तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला. महिनाभराच्या  उपचारांनंतर तिचा मृत्यू झाला. प्रीतीच्या हल्लेखोरास अटक करण्याची आणि या हल्ल्याच्या सीबीआय चौकशीची मागणी तिच्या आप्तांनी केली होती. या दरम्यान सरकारने तिच्या कुटुंबाला मदत म्हणून दोन लाख रुपये दिले होते. तरूणींवरील अ‍ॅसिड हल्ल्यांचे प्रकार वाढत असून त्यातील तरुणींच्या मदतीसाठी स्थापलेल्या ‘स्टॉप अ‍ॅसिड अ‍ॅटॅक’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी राठी कुटुंबियांना मदत केली होती. या संस्थेच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी  ही रक्कम त्यांना आम्ही देत आहोत, असे प्रीतीचा चुलत भाऊ ललित सोळंकी यांनी सांगितले.