रुग्णांकडून दामदुपटीने पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णवाहिकाचालकांना चाप लावण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. यापुढे पालिका रुग्णालयांच्या आवारात उभ्या असलेल्या खासगी रुग्णवाहिकांची आता अपघात वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नोंद करावी लागणार आहे.
पालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. अनेक वेळा रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी इतर रुग्णालयांमध्ये घेऊन जावे लागते. अशा वेळी पालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, तर रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या खासगी रुग्णवाहिन्यांकडे रुग्णांच्या नातेवाईकांना धाव घ्यावी लागते.
 खासगी रुग्णवाहिकाचालक अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन रुग्णाची ने-आण करीत आहेत. तसेच अनेक वेळा रुग्णाचे निधन झाल्यानंतर त्याचे पार्थिव घरी घेऊन जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांचा वापर केला जातो. त्या वेळीही रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णवाहिकाचालक वारेमाप पैसे उकळतात. रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी ही फसवणूक थांबविण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.
रुग्णालयाच्या आवारात उभ्या राहणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांची नोंदणी अपघात वैद्यकीय अधिकाऱ्याकडे करावी लागणार आहे. पालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास रुग्णाला खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अपघात वैद्यकीय अधिकाऱ्यावर सोपविण्यात येणार आहे.
 त्यामुळे खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून होणाऱ्या रुग्णांच्या लुबाडणुकीला आळा बसेल, असा विश्वास पालिका सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा एक प्रस्तावच राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी आरोग्य समितीपुढे सादर केला आहे.
 आरोग्य समितीच्या सोमवारी होत असलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Story img Loader