मुंबई : खासगी बँकेच्या जोधपुर शाखेतील उप व्यवस्थापकाच्या मदतीने आरोपींनी बँक खात्यातून ४१ लाख ८३ हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या पोलिसांनी खासगी बँकेच्या जोधपूर शाखेतील उप व्यवस्थापक पवनशिव भगवान दादीच (३१) याला अटक केली आहे. मुख्य आरोपींना या बँक अधिकाऱ्याने मदत केल्याचा आरोप असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिलकुमार जयराम कुमार (२५) यांच्या बँक खात्यावर अज्ञात व्यक्तीने ताबा घेतला होता. ही घटना १६ मार्च रोजी घडली. आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून ४१ लाख ८३ हजार रुपये अन्य ठिकाणी हस्तांतरित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच तातडीने तपासाला सुरूवात केली.

हेही वाचा…नाटयगृहांवरील कर, देखभालीची जबाबदारी सरकारची ; शरद पवार यांचे मत

तपासात कुंपणच शेत खात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपींनी जोधपूर येथील एका खासगी बँकेत जाऊन तक्रारदारांची खोटी कागदपत्रे सादर केली. त्या आधारावर बँकेच्या ऑनलाईन सुविधांसाठी आरोपींनी नोंदणी केली. त्यानुसार त्याला नवीन ई-मेल आयडी व पासवर्ड प्राप्त झाला. याशिवाय आरोपीने बँक खात्याचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकही बदलला. या सर्व गैरव्यवहार जोधपूर येथील खासगी बँकेच्या पाली रोड शाखेचा उप व्यवस्थापक पवनशिव भगवान दादीच (३१) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी बँक अधिकारी जोधपूर येथील रहिवासी आहे. तपासात पवनशिवचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानंतर सायबर पोलिसांचे पथक जोधपूरला दाखल झाले. त्यांनी तपासणी केली असता गुन्ह्यांत वापरण्यात आलेले बँक खात्याचे धनादेशही पवनशिवकडे सापडले. हा पुरावा हाती लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पवनशिवला याप्रकरणी अटक केली. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी कोण, मुख्य आरोपी आणि आरोपी अधिकाऱ्याचे नेमके काय सबंध आहेत, अशाच प्रकारे या टोळक्याने आणखी कुणाची फसवणूक झाली आहे का याबाबत आरोपीच्या बँकेलाही पोलिसांकडून कळवण्यात आले असून बँकेने पवनशिवने हाताळलेले सर्व व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे. आरोपीच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती सायबर पोलिसांच्या हाती लागली असून तपासासाठी लवकरच पथक जोधपूर येथे जाणार आहे.