मुंबई : ‘फलाट क्रमांक २ वर येणारी लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे, अशा अनेक उद्घोषणा प्रवाशांना तोंडपाठ झाल्या आहेत. परंतु, मध्य रेल्वे फक्त ‘दिलगिरी’ व्यक्त करते मात्र कार्यपद्धतीत सुधारणा होत नाही, असे स्पष्ट मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे. रेल्वेच्या या काराभारामुळे खासगी कंपनीतील कर्मचाऱयांना कार्यालयांमध्ये पोहोचायला उशीर होत असून आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागते आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर १,८१० लोकल फेऱ्या चालविण्याचा दावा केला जातो. मात्र वास्तवात या मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द होतात. तर, शेकडो गाड्या उशिरा धावतात. त्यामुळे लोकल रद्द होण्याच्या आणि विलंबाने धावण्याचा प्रकार सर्वाधिक मुख्य मार्गिकेवर होतो. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीने भरगच्च झालेल्या लोकलमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. लोकलमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या रोज विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी इच्छितस्थळी कितीही वेळेत पोहचण्याचा प्रयत्न केला तरीही वेळेचे गणित बिघडते. कार्यालयात पोहोचायला उशीर होते. अनेक खासगी कार्यालयांमध्येही गाड्यांच्या गोंधळामुळे होणारा विलंब ग्राह्य धरला जात नाही. कल्याणच्या पुढील ठिकाणी गाड्याही मर्यादित आहेत. रोज अनेकजण कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तासांहून अधिक कालावधी लागतो.
‘रोज मरे, त्याला कोण रडे’ अशी परिस्थिती मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे. मध्य रेल्वेचे अधिकारी येतात आणि जातात. परंतु, मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा काही सुधारला नाही. सध्या मुंबईतील रेल्वे स्थानकाची सजावट असून आहे, ती योग्य आहे. मात्र, अमृत भारत योजनेच्या नावाने स्थानकाला चुना लावला जात असून, मुंबईकरांना ‘चुना’ लावणे थांबविले पाहिजे. लोकल उशिराने धावल्यास, दिलगिरी व्यक्त करणे बंद करून, लोकल वेळेवर कशा धावतील, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच नवीन विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी यात अधिक लक्ष घालणे आवश्यक आहे. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
सध्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. विशेष रेल्वेगाड्या वाढवण्यात आल्याने, याचा फटका उपनगरीय रेल्वे सेवेवर होतोय. कसारा, कर्जत दिशेने प्रवास करणाऱ्या आणि तिथून सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नियमितसह विशेष रेल्वेगाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे या लोकल मुंबईत अनिश्चित वेळेत येतात. त्यामुळे रेल्वे मार्ग, फलाटाची उपलब्धता नसल्याने, लोकल सेवा खोळंबते. याबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड खदखद असून, आता प्रवासी रेल्वेमार्गावर उभे राहून, निषेध व्यक्त करण्याची वेळ आली आहे. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी महासंघ
लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने नोकरदार वर्ग, विद्यार्थी, छोटे व्यापारी, रुग्ण यांना विलंबाचा फटका बसतो. आसनगाव स्थानकातून सुटणाऱ्या लोकल कायम विलंबाने सुटतात. त्यानंतर मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरच्या अदलाबदलीसाठी ७-८ मिनिटे घेतले जातात. यामध्ये लोकल सुमारे १० ते १५ मिनिटे उशिरा होतो. यावर उपाय म्हणून या लोकलसाठी आसनगाव स्थानकात रनिंग स्टाफ नेमण्यात यावा. जेणेकरून लोकल वेळेत सुटेल. याबाबत संघटना आग्रही असून रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखवून उपाययोजना करावी. – उमेश विशे, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन
समाज माध्यमावर अनेक प्रवासी लोकल सेवेचा खोळंबा झाल्याच्या तक्रारी करतात. त्यावर मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाकडून आपत्कालीन साखळी खेचणे, रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या मुळे लोकलचा वक्तशीरपणा कमी आहे. तसेच प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडणे, समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) वर रस्ते वाहतूक जादा वेळ सुरू राहिल्याने, लोकल विलंबाने धावतात, असे सातत्याने स्पष्टीकरण दिले जाते.