सौरभ कुलश्रेष्ठ
क्रीडामंत्री विनोद तावडे यांचा मानस
राज्यात क्रीडा बहुतांश क्रीडा संकुले खेळाडूंसाठी उपयुक्त नाहीत, त्यांची दुरवस्था झाल्याचे क्रीडा विभागाला आढळून आले आहे. त्यामुळे कोल्हापुर परिसरात डी. वाय. पाटील, लातूर भागात मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापुरातील लोकमंगल यांसारख्या त्या भागातील नामवंत संस्थांना जिल्हा-तालुका क्रीडा संकुले चालवण्यासाठी- देखभालीसाठी देण्याचा विचार असल्याची माहिती शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली.
क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा विरोध डावलून धारावी क्रीडा संकुलाच्या खासगीकरण केले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून निधी मिळत नसल्याने क्रीडा संकुलांची झालेली दुरवस्था, पदे भरण्यात आर्थिक अडचणी असल्याने प्रशिक्षकांअभावी अनेक सोयीसुविधा पडून असल्याचे वास्तव याबाबत विनोद तावडे यांनी सविस्तर भाष्य केले.
ही संकुले सरकारची असल्याने ती सरकारने चालवावीत हा आग्रह तत्त्वत: योग्य आहे. पण प्रत्यक्षात क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना ते जमलेले नाही, हे वास्तव आहे. राज्यातील जवळपास २० ते २५ क्रीडा संकुलांना प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांची दुरवस्था दिसून आली. सोयी-सुविधा नाहीत किंवा असल्या तरी वापराविना-प्रशिक्षकांअभावी त्यांची अवस्था बिकट असल्याचे आणि खेळाडूंना या संकुलांचा काही उपयोग होत नसल्याचे दिसले. त्यानंतर आणखी ४०-५० क्रीडा संकुलांची माहिती चित्रफितींच्या माध्यमातून मागवली. त्या संकुलांची अवस्थाही तशीच होती, असे तावडे यांनी सांगितले. क्रीडा संकुलांसाठी मोठी जागा, बांधकांमासाठी ५ ते १० कोटी रुपयांचा खर्च होतो. त्यानंतर तो सारा वाया जातो. त्यामुळे क्रीडा संकुलांचा चांगला वापर व्हावा यासाठी खासगी संस्थांमार्फत त्यांच्या ‘देखभालीचे धोरण’ क्रीडा विभाग आणणार आहे. लातुरात अमित देशमुख यांची मांजरा, सोलापुरात सुभाष देशमुख यांची लोकमंगल, कोल्हापुरात डी. वाय. पाटील यांसारख्या नामवंत संस्थांशी क्रीडामंत्री तावडे यांनी प्राथमिक बोलणी केली आहेत.