मुंबई : गृहनिर्मिती क्षेत्रात देशात मुंबई अग्रेसर असून आता खासगी गुंतवणुकीतही पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाच्या वर्षांत निवासी घरांच्या निर्मितीत सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची खासगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबई परिसरात वेअर हाऊस उभारणीत सर्वाधिक म्हणजे १३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या खालोखाल बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. ‘नाईट फ्रँक’ या कंपनीने केलेल्या संशोधनाची माहिती अहवालाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील प्रमुख शहरांतील गृहनिर्मिती क्षेत्रात खासगी गुंतवणुकीत ३२ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षांत निवासी घरांच्या निर्मितीतील खासगी गुंतवणूक दुप्पट झाली आहे. २०१७ मध्ये व्यावसायिक कार्यालयाच्या निर्मितीती सर्वाधिक खासगी गुंतवणूक नोंदवली गेली होती. त्यातुलनेत आता निवासी गृहनिर्मितीत खासगी गुंतवणूकदार रस घेत असल्याचेही या अहवालात नमूद आहे. प्रामुख्याने संयुक्त अरब अमीराती, सिंगापूर येथील वैयक्तिक तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मुंबईतील गृहनिर्मितीत रस दाखविला आहे. निवासी क्षेत्राबरोबरच वेअर हाऊसमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. व्यावसायिक कार्यालयांच्या निर्मितीतील गुंतवणुकीत बंगळुरू आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ हैदराबाद, दिल्ली आणि मग मुंबईचा क्रमांक लागतो. गेल्या दोन वर्षांत मुंबईत निवासी गृहप्रकल्पांना वाढती मागणी असून त्या तुलनेत व्यावसायिक कार्यालयांच्या मागणीत घट झाली आहे.

हेही वाचा – ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती

हेही वाचा – कोल्हापूर विभागाची ‘व्हाय नॉट?’ महाराष्ट्राची लोकांकिका; रत्नागिरी विभागाच्या ‘मशाल’ला द्वितीय तर पुण्याच्या ‘सखा’ला तृतीय पारितोषिक

निवासी गृहनिर्मितीकडे खासगी गुंतवणूकदारांचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. आर्थिक स्थैर्य आणि वृद्धीमुळे परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. आश्चर्यकारकरीत्या वेअर हाऊस निर्मितीतही खासगी गुंतवणूक वाढली आहे. गेल्या काही वर्षांत देशातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि ऑनलाईन खरेदीमुळे मोठ्या प्रमाणात वेअर हाऊसची मागणी येऊ लागली आहे. यामुळे अर्थात व्यावसायिक कार्यालयाच्या मागणी घट झाली आहे. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. भविष्यात गृहनिर्मिती क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private investment of three and a half thousand crores in home construction sector in mumbai this year information from knight frank report mumbai print news ssb