मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांप्रमाणेच पालिकेच्या अखत्यारीतील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना जून २०१३ पासून मासिक ६ हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने तसा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेचे उपाध्यक्ष आनंद पवार यांनी दिली.

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणी व पगारवाढ देण्यात आली होती. महापालिकेच्या अखत्यारीतच असलेल्या खासगी अनुदानित व विनाअनुदानित  शाळांमधील शिक्षकांना मात्र त्यातून वगळण्यात आले होते. त्यांची २४०० ची वेतनश्रेणी २८०० करून बोळवण करण्यात आली आली होती. त्यामुळे  महापालिकांच्या शिक्षकांप्रमाणेच खासगी शिक्षकांनाही सहाव्या वेतन आयोगाचे आर्थिक लाभ देण्यात यावेत, अशी शिक्षक सभेची मागणी होती. त्यासाठी सभेचे अध्यक्ष रमेश जोशी, कार्यकारी अध्यक्ष शिल्पा नाईक, सरचिटणीस विजय पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मंगळवारी ७ मे रोजी पालिका प्रशासनाने खासगी शिक्षकांनाही सहाव्या वेतन आयोगानुसार वरिष्ठ वेतनश्रणी देण्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.

त्यानुसार ९३४७ खासगी शिक्षकांना मासिक ६ हजार रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे. पुढील महिन्यांपासून या शिक्षकांना नवीन वेतनश्रेणी व पगारवाढ लागू होणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

Story img Loader