मुंबई : अल्पवयीन विद्यार्थ्याचे नग्न छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासगी शिकवणी शिक्षकाला घाटकोपर पोलिसांनी रविवारी अटक केली असून आरोपीने तक्रारदाराला लाथा-बुक्क्याने मारहाण केल्याचा आरोपही तक्रारी करण्यात आला आहे. याबाबत घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.तक्रारदार १६ वर्षीय विद्यार्थी आहे. तो घाटकोपर परिसरात राहणाऱ्या आरोपीकडे शिकवणीसाठी जायचा. तक्रारीनुसार, गेल्या एका वर्षापासून आरोपी शिक्षक त्याचे शोषण करत होता.
आरोपीने (वय २४) शिकवणीसाठी व अभ्यासाच्या बहाण्याने पीडित मुलाला घरी बोलावले. त्यानंतर त्याच्यासह अश्लील कृत्य करून पीडित मुलाने मोबाईलमध्ये नग्न छायाचित्र काढले. तेव्हापासून तो पीडित मुलाला छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. गेल्या एका वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपीला विरोध केला असता त्याने लाथाबुक्क्याने तक्रारदाराला मारहाणही केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर १६ वर्षीय विद्यार्थ्याने याप्रकरणी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४, ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपीला अटक
आरोपी अभ्यास घेण्याच्या बहाण्याने गेल्यावर्षी ५ फेब्रुवारीपासून तक्रारदार मुलाला त्याच्या घरी बोलवत असे. अभ्यासाच्या बहाण्याने तो पीडित मुलाला त्याच्या घरीच झोपायला बोलवायचा. नेहमीच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने शनिवारी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून एक पथक आरोपीच्या राहत्या घरी पाठवले. त्यांनी तेथून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी रविवारी पहाटे आरोेपीला अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्या अंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.
२०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांच्या उकल होण्याच्या प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचीत व्यक्ती आहेत.