कोणे एकेकाळी सहकारातून रुजणाऱ्या उसातून निर्माण होणाऱ्या साखरेला आता खासगीकरणाची गोडी लागली आहे. सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग म्हणवला जाणारा साखर उद्योग आता खासगी मालकांच्या ताब्यात जाऊ लागला आहे. राज्यातील एकूण साखर उत्पादनापैकी २८.८ टक्के साखर खासगी कारखान्यांतून बाहेर पडत असून अवघ्या सहा वर्षांपूर्वी हे प्रमाण अवघे आठ टक्के होते. अर्थात खासगीकरण झाले असले तरी या उद्योगावरील राजकारण्यांचे वर्चस्व कायम आहे; किंबहुना बहुतेक कारखाने सर्वपक्षीय राजकारण्यांच्याच मालकीचे आहेत.
‘परमिटराज’ संपुष्टात आल्यानंतर सहकार क्षेत्राने गमावलेला कारखानानिर्मितीचा प्राधान्यक्रम, डबघाईला आलेल्या सहकारी कारखान्यांची खासगी मालकांकडून खरेदी आणि सहकारी कारखानानिर्मितीसाठी अर्थसाह्य तसेच हमी देणे बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय या कारणांमुळे आज राज्यातील साखर उद्योगावर खासगी कंपन्यांनी वर्चस्व स्थापन केले आहे. राज्यातील साखर उत्पादनाची वर्गवारी या वर्चस्वाची ग्वाही देते. १९९८-९९साली राज्यात केवळ तीन साखर कारखाने होते (दोशी कुटुंबाच्या मालकीचा रावळगाव शुगर फार्म, आपटे यांच्या मालकीचा न्यू फलटण शुगर वर्क्स आणि सासवड माळी साखर कारखाना). या तीन कारखान्यांतून दरवर्षी १.२३ लाख टन साखरेचे उत्पादन होत असे. राज्याच्या त्या वेळेच्या उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण २.३ टक्के इतकेच होते. मात्र, सप्टेंबर २०१४मधील आकडेवारी पाहता राज्यात ६४ खासगी साखर कारखान्यांतून २२.३७ लाख टन (२८.८ टक्के) साखर उत्पादन झाल्याचे दिसून येते. अगदी २००४-०८मध्येही राज्यात १९ साखर कारखानेच खासगी मालकांचे होते. त्यातून १.७७ लाख टन (८ टक्के) साखर निर्माण होत होती. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात, गेल्या पाच-सहा वर्षांत अनेक खासगी कारखाने उभे राहिले आहेत. सध्या सहकार आणि खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांचे प्रमाण ७०:३० असे आहे. मात्र, येत्या पाच वर्षांत ते ३०:७० असे व्यस्त होताना दिसेल,’ असे भाकीत स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी वर्तवले.
राजकारण्यांची ‘साखरपेरणी’
सुभाष देशमुख: भाजप आमदार (सोलापूर दक्षिण)
लोकमंगल समूह: तीन कारखाने, (उत्पादन १.४३)
अजित पवार : राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते
श्री अंबालिका शुगर, दौंड शुगर, जरंडेश्वर साखर या कारखान्यांच्या संचालकांशी संबंधित.
(एकूण उत्पादन २.२८ लाख टन)
राजेंद्र पवार: अजित पवारांचे बंधू
बारामती अॅग्रो मिल्स, इंदापूर व कन्नड
(एकूण उत्पादन ८६.८९१ टन)
नितीन गडकरी: केंद्रीय मंत्री
तीन कारखाने (एकूण उत्पादन ६१,९३३ टन)
विनोद तावडे: भाजप नेते
श्रीनाथ म्हसोबा मिल, दौंड (उत्पादन ४१,१५५ टन)
सिद्धराम म्हेत्रे: काँग्रेस
मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट
(उत्पादन ५७,५०० टन)
दिलीप देशमुख: विलासराव देशमुख यांचे बंधू
(जागृत शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रिज, देवनी)
पतंगराव कदम: काँग्रेस
सोनहिरा को-ऑपरेटिव्ह, कडेगाव
बबनराव पाचपुते: भाजप
(श्री साईकृपा शुगर, श्रीगोंदा)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा