राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याविरोधात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आश्वासन तटकरे यांनी विधिमंडळाच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. मात्र, तपास पथक नेमण्याऐवजी तटकरे यांनी माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली केवळ चौकशी पथक नेमले. हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगत खडसे यांनी तटकरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष दिलीपी वळसे-पाटील यांच्याकडे दिला. वळसे-पाटील यांनी या प्रस्तावावरील आपला निर्णय राखून ठेवला आहे.
राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्चूनही अपेक्षित जमीन सिंचनाखाली आली नाही. जलसिंचनाचे अनेक प्रकल्प अद्याप अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा विषय सभागृहात सातत्याने लावून धरल्याने विशेष तपास पथक नेमण्याची घोषणा तटकरे यांनी सभागृहात केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा