मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केल्याने त्याची बहिण आणि काँग्रेसची खासदार प्रिया दत्त यांची राजकीय कोंडी होणार आहे. पुढील वर्षी निवडणुकीत प्रिया दत्त यांच्या विरोधात भावाच्या शिक्षेचा मुद्दा वापरला जाईल आणि हा मुद्दा त्यांना त्रासदायक ठरू शकतो.
उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त या अ. भा. काँग्रेसच्या सचिव पदावर आहेत. मुंबईत काँग्रेससाठी प्रिया दत्त या प्रतिनिधीत्व करीत असलेला मतदारसंघ हा सर्वात सुरक्षित मानला जातो. सुनील दत्त यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक किंवा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रिया दत्त या मोठय़ा फरकाने निवडून आल्या आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी प्रिया दत्त यांच्या विरोधात प्रचारासाठी संजय दत्त याच्या शिक्षेचा मुद्दा खुबीने वापरला जाईल. या मुद्दय़ावर जनमताचा रेटा विरोधात जाऊ शकतो. संजय दत्त याच्या अटकेनंतर सुनील दत्त यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याचे टाळले होते. संजय दत्तची शिक्षा कायम झाली असली तरी प्रिया दत्त यांना निवडणुकीत फटका बसणार नाही, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा