२०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी जाहीर केले आहे. एका पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती सार्वत्रिक केली आहे. उत्तर-मध्य मुंबईमधून त्या दोन वेळेस खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या.


राजकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना आपली ओढाताण होत असल्याने आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे. यापूर्वी काँग्रेसने आपल्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे हाताळल्या. मात्र, राजकारणापलिकडेही आयुष्यात बरंच काही असल्याने मला आता त्याकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे दत्त यांनी म्हटले आहे.

उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातून प्रिया दत्त या दोनदा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीत त्यांना भाजपाच्या पूनम महाजन यांनी मात दिली होती. मात्र, आता निवडणुकीत माघार घेतल्यानंतर काँग्रेस या जागेवरून कोणाला उमेदवारी देतंय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पत्रकातून दत्त यांनी राहूल गांधी यांच्यासह, मतदारसंघातील नागरिक आणि माध्यमांचेही आभार मानले आहेत.

Story img Loader