गळफास घेतलेली बहीण मेघना आणि गच्चीवरुन उडी मारून आत्महत्या केलेल्या वडिलांना पाहून प्रियांकाही आत्महत्या करणार होती. पण रहिवाशांनी वेळीच तिला वाचविले. अ‍ॅण्टॉप हिल येथील पंजाबी कॉलनीत सोमवारी रात्री हा दुर्देवी प्रकार घडला. अ‍ॅण्टॉप हिल पोलीस आता मेघनाच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स तपासून तिच्या प्रियकराची चौकशी करणार आहेत.
अ‍ॅंटॉप हिल येथील पंजाबी कॉलनीत राहणाऱ्या मेघना खन्ना (२२) या तरुणीने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्यावेळी तिचे वडील घरी परतले तेव्हा त्यांनी गळफास लावलेल्या अवस्थेत मेघनाला पाहिले. त्याचवेळी मेघनाची मोठी बहीण प्रियांकाही घरी परतली होती. प्रियांका आयटी सेक्टरमध्ये काम करते.  
मुलीची अवस्था पाहून व्यथित झालेल्या रमेश यांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या प्रियांकानेही उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु रहिवाशांनी तिला वेळीच वाचविले.
मेघना (१९) ही खालसा महाविद्यालयात मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी होती. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. वडिलांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. रविवारी तिचे वडिलांशी भांडण झाले होते. सोमवारी संध्याकाळी चार वाजता पुन्हा तिचे वडिलांशी भांडण झाले होते. त्यामुळे ते रागाने घरातून बाहेर गेले होते.
रमेश यांच्या पत्नीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते तर लहान मुलीचेही निधन झाले होते. त्यामुळे ते आधीच निराश झाले होते. पोलीस मेघनाच्या मोबाईलमधील कॉल्सचा तपशिल तपासत असून तिच्या प्रियकराचीही चौकशी करणार आहेत.