अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणात सनातन संस्थेसह हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याऐवजी दाभोळकर कुटुंबियांचे वर्चस्व असलेल्या ‘परिवर्तन ट्रस्ट’च्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केल्यास गुन्हेगार सापडू शकेल, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले. आम्ही या संदर्भात सीबीआय तसेच पोलिसांकडे अनेक गोष्टींची माहिती दिली असून यात परदेशातून आलेल्या निधीचा नेमका कोठे व कोणी वापर केला हे तपासण्याची विनंती केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर घाईघाईने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू करणाऱ्या सरकारला एक वर्षांनंतरही त्यांच्या हत्येचा तपास लागू शकलेला नाही. या प्रकरणात ‘सनातन’सह अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना पोलिसांनी बदनाम केले. मात्र दाभोळकरांच्या ट्रस्टची व परदेशातून आलेल्या आणि खर्च केलेल्या रकमांच्या व्यवहाराची चौकशी करण्याचे पोलिसांकडून टाळण्यात आले आहे. याबाबत आम्ही पोलीस तसेच सीबीआयकडे लेखी पत्र पाठवून तसेच पुरावे देऊनही चौकशी केली जात नसल्याचे पत्रकार परिषदेत रमेश शिंदे यांनी सांगितले. प्रामुख्याने दाभोळकर कुटुंबियांचा समावेश असलेल्या परिवर्तन ट्रस्टला स्वित्र्झलडमधील एका संस्थेकडून तसेच विदेशातून कोटय़धी रुपयांचा निधी मिळाला आहे. २०१० नंतर या ट्रस्टचा हिशेब धर्मादाय आयुक्तांना का सादर करण्यात आलेला नाही, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.
सेंद्रिय शेतीच्या नावाखाली ‘परिवर्तन ट्रस्ट’कडे स्वीसमधून आलेला पैसा हा ‘एफसीआसी’च्या नियमानुसार त्याच कामासाठी वापरला जाणे बंधनकारक आहे. ‘परिवर्तन ट्रस्ट’ने यातील किती निधी सेंद्रिय शेतीसाठी वापरला याची चौकशी पोलीस व सीबीआय का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आम्ही पोलिसांना काही महत्त्वाची माहिती देऊनही त्याचा उपयोग केला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा