महाराष्ट्रातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत, अध्यपक नाहीत तसेच एकाच जागेत अनेक शैक्षणिक उपक्रम चालवत असल्यासंदर्भातील गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देणाऱ्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय कें द्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राज्यातील ३६५ अभियांत्रिकी महाविद्यालयांतील अनेक महाविद्यालयात निकषानुसार अध्यापक नासताना संस्थाचालकांकडून अध्यापकांची खोटी माहिती सादर केली जाते. अनेक महाविद्यालयात नियमित प्राचार्य नाहीत, नियमानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली अडीच एकर जागा अनेक महाविद्यालयांकडे नाही तर अनेक महाविद्यालयांच्या जागांमध्ये एकाचवेळी अनेक अभ्यासक्रम चालविले जातात. अडीच एकर जागेत अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर पॉलिटेक्निक, एमबीएसह शाळांही चालविण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळूनही एआयसीटीई, राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय अथवा विद्यापीठाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. राज्य शासनाच्या सात अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही आज अध्यापकांची ३९९ पदे रिक्त आहेत. ‘एआयसीटीई’कडून अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देताना ज्या ‘ग्रीन चॅनल’चा वापर केला जातो तोच भ्रष्टाचाराचा आगार असल्याचे भाजपचे माजी आमदार संजय केळकर यांनी स्मृती इराणी यांना सादर केलेल्या कागदपत्रांत म्हटले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्मृती इराणी यांना पाठविलेल्या पत्रात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या घोटाळ्यांची कार्यपद्धतीच नमूद केली आहे. तावडे यांनी याप्रकरणी स्मृती इराणी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असून शिक्षण सम्राटांची अभियांत्रिकी महाविद्यालयावर कारवाई हे मोठे आव्हान आहे. एआयसीटीईने सध्या राज्यातील २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मान्यतेसंदर्भात तपासणीचे काम हाती घेतले असले तरी एआयसीटीईने गेल्या चार वर्षांत मान्यता दिलेल्या तसेच तक्रारी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची चौकशी कशाप्रकारे केली तेही तपासणे आवश्यक असल्याचे तावडे यांनी सांगितले. आपण या प्रकरणी काही महाविद्यालयांची कागदपत्रेच पुराव्यासाठी स्मृती इराणी यांच्याकडे सादर करणार असल्याचेही तावडे व केळकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा