मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत रासायनिक कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे समुद्रात नाही, पण खाडय़ांमध्ये मासळीचे प्रमाण घटले असले तरी मत्स्यदुष्काळ नसल्याचे प्रतिपादन मस्त्यव्यवसायमंत्री मधुकर चव्हाण यांनी विधानपरिषदेत केले. यासंदर्भात कोणत्या उपाययोजना करता येतील, यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. पाच वर्षांतील सरासरी मत्स्योत्पादनाच्या ५० टक्क्य़ांहून कमी उत्पादन झाले, तर मासळी दुष्काळ जाहीर केला जातो. पण यावर्षी तशी परिस्थिती नसल्याचे चव्हाण यांनी विजय गिरकर, अ‍ॅड. आशिष शेलार, विनोद तावडे आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी खरेदी केलेले सोलर वॉटर हिटर बसविण्यात अडचणी आल्याची कबुली देत पुरवठादार रश्मी इंडस्ट्रीज कंपनीला नोटीस दिल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. ही कंपनी केंद्र सरकारच्या ‘रेट काँन्ट्रॅक्ट’ यादीतील असल्याने विनानिविदा हे काम दिल्याचे मोघे यांनी सांगितले. कंपनीने ११४९ पैकी ७३३ हिटरचा पुरवठा करण्यात आला. पुरवठय़ात अडचणी असल्याने कंपनीने अनेकदा मुदतवाढ मागितली. मुदत देऊनही पुरवठा न झाल्याने नोटीस दिल्याचे मोघे यांनी स्पष्ट केले. पण  सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करीत उत्तराने समाधान न झाल्याचे सांगितल्याने सभापती शिवाजीराव देशमुख यांनी हा प्रश्न राखून ठेवला.

Story img Loader