राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याविरुद्धच्या तक्रारीची चौकशी सुरू आहे, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात दिली. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही पाटील यांची नियमानुसार चौकशी सुरू आहे, त्यात तथ्य आढळल्यास कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी रणजीत पाटील यांच्या राजीनाम्याची विधानसभेत मागणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासह माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि काही बडय़ा शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेसंबंधी गुप्त चौकशी सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’च्या बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर, त्याचे विधिमंडळात व राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांनाही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात खुलासा करावा लागला. अकोला येथील महिती अधिकार कार्यकर्ते विक्रांत प्रल्हादराव काटे यांनी विविध अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जाची प्रत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांना सादर केली आहे. अशा प्रकारे अर्ज प्राप्त झाल्यानंतर, संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना त्याची प्रत पाठवून शहानिशा केली जाते. त्यानुसार प्राप्त अर्जाची प्रत अमरावती जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांना पडताळणीसाठी पाठविली आहे. संबंधित पोलीस अधीक्षकांनी आपला अहवाल दिल्यानंतर त्याबद्दल आवश्यक ती पुढील कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र अपसंपदाबद्दल गृहराज्यमंत्र्यांची चौकशी सुरू असल्याचा जो काही संभ्रम निर्माण केला जात आहे, त्यात तथ्य नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यानी केला.
दरम्यान, गृहराज्यमंत्र्याच्या गुप्त चौकशीच्या वृत्ताचे विधानसभा व विधान परिषदेत पडसाद उमटले. गृहराज्यमंत्र्यांची चौकशी सुरू आहे, तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसेभत केली. त्यावर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर चर्चा करता येत नाही, असे या पूर्वी अध्यक्षांनी अनेकदा निर्णय दिले आहे, असा मुद्दा अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यावर अधिक चर्चा न होऊ देता पुढील कामकाज पुकारले. गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याविषयीची चौकशी नियमानुसार सुरू आहे, जर त्यात तथ्य आढळले तर, कारवाई करु, तथ्य नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा