बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी ठेवण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’विषयी ‘फेसबुक’वर प्रतिक्रिया देणाऱ्या दोन तरुणींच्या अटकेवरून सध्या वादंग सुरू असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयीही सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मजकूरही पालघर येथील एका अल्पवयीन मुलाने प्रसिद्ध केला आहे. मात्र पालघर पोलिसांनी या वेळेस सावध पवित्रा घेत या मुलाला अटक न करता त्याला चौकशीसाठी बुधवारी ताब्यात घेतले. राज यांच्याविषयी ‘फेसबुक’वर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर हा आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध लावून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती नको म्हणूनच या वेळेस या मुलाला सध्यातरी केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पालघर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader