मुंबई : जुहू येथील हॉटेल किंग इंटरनॅशनल लगतच्या ग्लोबल तापस बारमधील अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केले.वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याने अपघातापूर्वी जुहू येथील ग्लोबल तापस बारमध्ये मित्रांसमवेत मद्यप्राशन केले होते. त्यांनतर, दारूच्या नशेत असतानाही त्याने मोटार चालविली.
बेदरकारपणे मोटार चालवत असताना वरळी येथे दुचाकीला धडक देऊन वृध्द दांपत्यास चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर, कायद्याचे पालन न करता आरोपीला दारू दिल्याप्रकरणी बारवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी बारमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला.