मुंबई : भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचे नवनवीन स्त्रोत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुलाबा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे भविष्यात या केंद्रातून पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती होऊ शकणार आहे. या केंद्रातून दरदिवशी १२ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.
पाण्याची वाढती मागणी आणि पाणी तुटवडा यातील तफावत कमी करण्यासाठी महानगरपालिकेने पाण्याचे नवनवीन स्त्रोत शोधण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या मुंबईला तानसा, मोडक सागर (वैतरणा), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या धरणांतील पाणी भविष्यात मुंबईसाठी अपुरे पडणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने गारगाई, पिंजाळ, दमणगंगा धरण प्रकल्पाचे नियोजन केले आहे. मात्र ते प्रकल्प रखडले असून समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा प्रकल्पही चर्चेत आहे. अपारंपरिक स्त्रोत निर्माण करताना महानगरपालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर तृतीय स्तरीय प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करण्याचाही प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा >>>उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टर; मुंबईत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
घराघरातून आणि कारखान्यातून उत्सर्जित होणारे सांडपाणी व मलजलाचे व्यवस्थापन महापालिकेतर्फे करण्यात येते. सव्वाकोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत दररोज साधारणत: दोनशे ते अडीचशे कोटी लिटर सांडपाण्याची निर्मिती होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या पाण्यावर महानगरपालिकेच्या उदंचन केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्र, नदी किंवा खाडीत सोडले जाते. समुद्रात सोडले जाणारे पाणी अधिक चांगल्या दर्जाचे असावे याकरीता महानगरपालिकेने ‘मुंबई मलनिःसारण प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत अंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. सात ठिकाणी असलेल्या व्यवस्थेची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. मात्र सांडपाणी प्रकल्पाला आताच सुरूवात झाली असून हे प्रकल्प बांधून पूर्ण होण्यास अजून चार – पाच वर्षे लागणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात १२.७३ टक्के पाणीसाठा, पाणी कपातीबाबत लवकरच निर्णय
कुलाबा येथे २०२० मध्ये महानगरपालिकेचे नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या पाण्यावर आधुनिक पद्धतीने तृतीय स्तरावरील प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य पाण्यात रुपांतरित करता येईल का याची चाचपणी करण्यात येणार आहे. त्याकरीता महानगरपालिकेने नुकतीच सल्लागारांची निवड केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यास दोन – तीन वर्षे लागणार असून त्यामुळे या केंद्रातून १२ दशलक्षलीटर पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हे पाणी पिण्याची मानसिकता असेल का
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या सात ठिकाणच्या मलजल प्रक्रिया केंद्रांतील पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र त्याला अद्याप वेळ आहे, अशी माहिती पी वेलरासू यांनी दिली. दरम्यान, सांडपाण्यापासून तयार केलेले हे पाणी पिण्याची लोकांची मानसिकता असेल का याचाही विचार करावा लागणार असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.