गणितासारखा किचकट विषय अत्यंत सुलभपणे शिकविणारे आणि गणिताला लोकप्रियता मिळावी यासाठी झटणारे प्रा. स. पां. देशपांडे यांचे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मुंबई आणि पुणे येथील महाविद्यालयांमध्ये ३८ वर्षे गणिताचे अध्यापन केले अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी त्यांनी लिहिलेली पाठय़पुस्तके गेली ५० वर्षे वापरात आहेत. ‘रँगलरचे ग्लॅमर’, ‘गणितानंदी कापरेकर’, ‘संख्यादर्शन’, ‘संख्याशास्त्राचे किमयागार’ ही त्यांची गणितावरील पुस्तके अभ्यासकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. अलिकडेच त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टसाठी ‘शून्या’वर इंग्रजीत पुस्तके लिहून पूर्ण केले होते. गणितावर त्यांनी ५० भाषणे दिली होती आणि गणित लोकप्रिय करण्यासाठी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून त्यांनी २५० लेखही लिहिले होते. राज्य सरकारच्या ‘गणित परिभाषा कोश’ आणि मराठी विज्ञान परिषदेच्या तीन कोशांसाठी त्यांनी काम केले होते. परिषदेच्या पत्रिकेत त्यांचे २५ लेखही प्रसिद्ध झाले होते. तीन वर्षांपूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांना मानद सभासदत्व दिले होते.