मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारितील शिक्षणसम्राटांच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील घोटाळे व त्रुटींविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘सिटिझन फोरम’ संघटनेचे प्राध्यापक वैभव नरवडे यांना मंगळवारी मध्यरात्री धारावी पोलिसांनी अटक केली. याविरोधात अध्यापक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर सकाळी प्राध्यापक नरवडे यांची जामीनावर सुटका करण्यात आली. हा प्रकार संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी प्राध्यापकांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांपर्यंत सर्वाकडे केली आहे.
राज्यातील शिक्षण सम्राटांच्या बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (एआयसीटीई)च्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारितील अनेक महाविद्यालयांच्या संलग्नतेचा मुद्दा, महाविद्यालयांकडील अपुरी जमीन, एकाच जमिनीवर अनेक शैक्षणिक दुकाने चालवणे, विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयासह अनेक सुविधा नसणे, एआयसीटीईच्या निकषांची पूर्तता न करता प्रवेश प्रक्रिया राबवणे अशा अनेक त्रुटी व घोटाळ्यांसदर्भात ‘सिटझन फोरम’चे प्राध्यापक वैभव नरवडे, प्रा. समीर नानिवडेकर, प्रा. समीर शेलगावकर आदींनी सातत्याने आवाज उठवला. शीव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्रुटींसंदर्भात आवाज उठवला म्हणून महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना चिथावून त्यांच्यावतीने करण्यात आलेल्या खोटय़ा तक्रारींची दखल घेऊन धारावी पोलिसांनी मध्यरात्री नरवडे यांना घरातून अटक केली आणि रात्रभर कोठडीत डांबून ठेवले. आपल्याविरुद्ध आरोप काय, अशी विचारणा करूनही नरवडे यांना काहीही सांगण्यात आले नाही.
चौकशीची मागणी
प्रदेश भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि माजी आमदार संजय केळकर यांनी या अटक प्रकरणाची तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील घोटाळयांच्या चौकशीची मागणी केली आहे. विद्यार्थी संघटनेचे मनोज टेकावडे व सिनेट सदस्य महादेव जगताप यांनीही या प्रकरणाचा निषेध केला आह़े
घोटाळे उघड करणाऱ्या प्राध्यापकाला अटक!
मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारितील शिक्षणसम्राटांच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील घोटाळे व त्रुटींविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘सिटिझन फोरम’ संघटनेचे प्राध्यापक वैभव नरवडे यांना मंगळवारी मध्यरात्री धारावी पोलिसांनी अटक केली.
First published on: 12-06-2014 at 04:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professor reveal scams arrested