लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. प्रशासनाकडून नुकतीच प्राचार्य, संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विभागप्रमुख या मतदारसंघासाठीची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली असून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई विद्यापीठाने अलीकडेच नोंदणीकृत पदवीधरांची तात्पुरती मतदारयादी आणि अपात्र ठरलेल्या अर्जांची कारणासहित यादी जाहीर केली. यामध्ये ७२ हजार ६५८ अर्ज पात्र आणि तब्बल ४० हजार ६१३ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. विविध मतदारसंघांच्या जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीवर काही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेक शिक्षकांना अंतिम मतदारयादीत अपात्र ठरविण्यात आले असून त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे. शिक्षकांना विद्यापीठाकडून असलेली मंजुरी तपासण्यात आली. मात्र संस्थाचालकांची धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदणी आणि त्यांचे बदल अर्ज तपासण्यात आले नाहीत. अधिसभा निवडणुकीच्या मतदारयादीतील त्रुटींबाबत आम्ही नोव्हेंबर २०२२ पासून प्रभारी कुलगुरूंकडे पाठपुरावा करीत आहोत, परंतु याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही आता या विषयासंदर्भात कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठविले आहे’, असे मुक्ता शिक्षक संघटनेचे सचिव सुभाष आठवले यांनी सांगितले.

आणखी वाचा-बाऊन्सर्सच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री? पार्ले, जुहूतील नाईट क्लबवर नजर

‘मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in या संकेतस्थळावरील ‘इलेक्शन २०२२’ या लिंकवर किंवा https://mu.eduapp.co.in या संकेतस्थळावर ‘वोटर लिस्ट’ या सदराखाली ‘क्लिक इअर फॉर फायनल वोटर लिस्ट’ या पर्यायावर क्लिक करून सदर विविध प्रवर्गातील मतदारांना मतदारयाद्या पाहता येतील. सर्व मतदारांच्या मोबाइलवर मतदारयादी प्रसिद्धी संदर्भातील संदेश पाठविण्यात आला आहे. लवकरच अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल’, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी स्पष्ट केले.

अंतिम मतदार यादी

मतदारसंघ – पात्र – अपात्र – एकूण अर्ज
प्राचार्य – १२५ – ३५ – १६०

संलग्न महाविद्यालयातील शिक्षक – ३०८७ – ५९७- ३६८४
विद्यापीठातील शिक्षक – १२० – १६३ – २८३

व्यवस्थापन प्रतिनिधी – ८५ – ९८ – १८३
विभागप्रमुख – ६७९ – २९३ – ९७२

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Program of adhi sabha election will be announced soon mumbai print news mrj