मुंबई : काळानुसार बदललेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीनुसार स्त्रियांनी कोणती भूमिका घेतली आणि कोणती घ्यायला हवी होती, याचे अवलोकन इतर अनेक कलांप्रमाणेच नाटकातूनही केले गेले. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या जाणिवा-नेणिवा कशा बदलल्या, सामाजिक-राजकीय परिस्थितीचा तिच्यावर कसा परिणाम झाला याचा रंगमंचीय आविष्कारातून वेध घेणाऱ्या ‘ती’ची भूमिका या कार्यक्रमाचे ‘लोकसत्ता’तर्फे मंगळवार, २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या कार्यक्रमात सहा नाटककारांच्या नाटकांतील प्रवेश सादर होणार आहेत.

बदलत्या समाजरचनेबरोबर स्त्रीचे बदललेले स्थान, तिने घेतलेल्या भूमिका, नातेसंबंध असोत वा शिक्षण-नोकरीतील आव्हाने स्वीकारत झालेली तिची वाटचाल या सगळ्याचे प्रतिबिंब नाटकातून प्रभावीपणे उमटले. कालौघात बदलत गेलेल्या स्त्रीच्या विविध रूपांच्या रंगमंचीय आविष्कारातून घेतलेला धांडोळा म्हणजे ‘लोकसत्ता’चा ‘ती’ची भूमिका हा कार्यक्रम. ‘ती’ची भूमिका या कार्यक्रमाची संकल्पना आणि नाटककारांचा स्त्री पात्र मांडतानाचा दृष्टिकोन, अभ्यास आणि संबंधित नाटकादरम्यान घडलेले किस्से अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या ओघवत्या सूत्रसंचालनातून जाणून घेता येणार आहेत.

या कार्यक्रमाचे संहिता लेखन मुग्धा गोडबोले यांनी केले आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे आणि नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचे आहे, तसेच या कार्यक्रमाचे संयोजन ‘मिती ग्रुप’ यांचे आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी एका व्यक्तीस एक प्रवेशिका देण्यात येईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्रीची हतबलता, तिची बंडखोरी, तिचा निर्धार, कमालीच्या संघर्षानंतर बदललेली तिची विचारधारा, तिचा प्रगल्भपणा, तिचा अवखळपणा अशा वेगवेगळ्या स्त्रीत्वाच्या छटा प्रतिभावंत नाटककारांनी रंगमंचीय आविष्कारातून बोलक्या केल्या. स्त्रीत्वाच्या विविध रूपांचा आणि स्त्रीत्वाच्या बदलत गेलेल्या जाणिवांचा प्रवास रंगमंचीय आविष्कारातून अनुभवण्याची संधी ‘ती’ची भूमिका या लोकसत्तातर्फे आयोजित कार्यक्रमातून मिळणार आहे.

कोणकोणते नाटय़प्रवेश होणार

●मुलगी झाली हो – लेखिका : ज्योती म्हापसेकर, सादरकर्ते : स्त्री मुक्ती संघटनेच्या कलाकार

माझा खेळ मांडू दे – लेखिका : सई परांजपे, सादरकर्ते : विद्या करंजीकर, सुरुची आडारकर

कमला – लेखक : विजय तेंडुलकर, सादरकर्ते : भार्गवी चिरमुले, संजना पाटील

तन मन – लेखक : रत्नाकर मतकरी, सादरकर्ते : सुप्रिया विनोद, मंगेश भिडे

आयदान – लेखिका : उर्मिला पवार, सादरकर्ते : शुभांगी भुजबळ, शिल्पा साने, गीता पांचाळ

सावित्री – लेखक : जयवंत दळवी, सादरकर्ते : स्वानंदी टिकेकर, पल्लवी अजय, संतोष वेरूळकर