सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांचा आरोप
सनातन संस्था आणि संबंधित व्यक्तींकडे संशयाचे बोट दाखवून विवेकी गोंगाट निर्माण करायचा आणि खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यापासून पोलिसांना परावृत्त करायचे. दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळेच सनातन संस्थेला लक्ष्य करून तपास सुरू असल्याचे मत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शुक्रवारी मुंबईत व्यक्त केले.
कॉ. पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड या सनातनच्या साधकास तांत्रिक पुराव्याच्या आधारे निव्वळ अटक झाल्यानंतर दाभोलकर-पानसरे कुटुंबीय, प्रा. शाम मानव, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, सचिन सावंत आदींनी हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही, न्यायालयाने कुणालाही दोषी ठरविलेले नाही, असे असतानाही सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी सुरू झाली असल्याचे सांगून वर्तक म्हणाले की, दाभोलकर-पानसरे प्रकरणात पुरोगाम्यांची एकांगी विचारसरणी लक्षात घेता त्यांच्या दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे तपास करावा आणि या हत्यांचे सर्व पैलू तपासण्यात कसलीही कसर राहू नये, असे आदेश द्यावेत, अशी मागणी वर्तक यांनी यावेळी केली.
सनातन संस्थेने त्यांचे आर्थिक घोटाळे उघड केले असल्याने काही निष्कर्षांप्रत तपास यंत्रणा पोहोचू नयेत, या धडपडीतून सनातनला लक्ष्य केले जात आहे का, याचीही सखोल चौकशी व्हावी आदी मागण्याही हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. संजिव पुनाळेकर यांनी या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.

Story img Loader