मुंबई : महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता महानगरपालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविणारी ‘झोमॅटो’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आता खाद्यपदार्थ वितरणाच्या क्षेत्रातही महिला बचत गट आपला ठसा उमटविणार आहेत. या उपक्रमात महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार असून सुरुवातीला मुलुंड परिसरात हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. कौतुकाची बाब म्हणजे ‘झोमॅटो’सोबत महिला बचत गटांसाठी अशाप्रकारे उपक्रम राबविणारी मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महानगरपालिका विविध योजना, उपक्रम राबवित असते. त्याअंतर्गत महापालिकेने ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ५ मार्चपासून सुरुवात करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते, तसेच नियोजन विभागाच्या संचालिका प्राची जांभेकर, ‘झोमॅटो’चे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश आहुजा यांच्या उपस्थितीत मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमासाठी एकूण ३० ते ४० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ महिलांची निवड करण्यात आली आहे. आता या महिला खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करणार आहेत.

खाद्यपदार्थ वितरणात आतापर्यंत पुरुषांचीच संख्या अधिक होती. हीच बाब अधोरेखित करून महानगरपालिकेने यासाठी बचत गटाच्या ३० ते ४० महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच स्व:रक्षणाचेही धडे दिले. यासोबतच मोबाईल ॲपद्वारे या महिलाना प्रसंगी गरज भासल्यास आपल्कालीन संदेश (एसओएस) पाठवून स्वत:चे रक्षण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. झोमॅटोसोबत अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच महानगरपालिका आहे. या उपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येणार आहेत. सुरुवातीला महानगरपालिकेच्या टी विभागात म्हणेच मुलुंड परिसरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने इतर सर्व विभागांमधील बचत गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या स्वयं सहायता समुहाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

लोणची, पापड तयार करणे, कापडी पिशव्या तयार करणे, सजावटीची साहित्य तयार करणे अशी कामे बहुतांश बचत गटांमार्फत केली जातात. मात्र, आता ही पारंपरिक चौकट ओलांडून महिलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील धावते आयुष्य, बदलती जीवनशैली, वेळेची कमतरता, नोकरी-व्यवसायामुळे होणारी फरफट यामुळे अनेकांना भूक भागवण्यासाठी विविध उपाहारगृहे, भोजनालय, खानावळी यावर अवलंबून राहावे लागते. साहजिकच अशाप्रकारे खाद्यपदार्थ कार्यालयात, घरी उपलब्ध झाल्यास अनेकांची सोय होते. या क्षेत्रात आता अनेक व्यावसायिक कंपन्या सेवा देतात. त्यातील नामांकीत असलेल्या झोमॅटो कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेने बचत गटाच्या महिलांसाठी ‘प्रोजेक्ट आर्या’सुरू केला आहे.

सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती

प्रोजेक्ट आर्यामध्ये सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा झोमॅटोकडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी रजा, नि:शुल्क सुरक्षा साहित्य, कुटुंबासाठी आदी बाबींचा समावेश आहे. सध्या मुलुंड येथे इच्छुक महिलांकरीता झोमॅटो ॲपवर नोंदणीसाठी प्रशिक्षण सत्रे आणि इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

Story img Loader