पालिकेच्या घाटकोपर विभाग कार्यालयात दुय्यम अभियंत्याला मारहाण झाल्यामुळे अभियंत्यांमध्ये असंतोष धगधगू लागला असून त्यांना शांत करताना पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. प्रसंगी मनसे आमदार राम कदम यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रर करू असे आश्वासन देऊन अशी पालिका आयुक्तांनी तूर्तास अभियंत्यांना शांत केल्याचे समजते.
अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणाऱ्या पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला गुरुवारी घाटकोपर येथील त्याच्या कार्यालयात काही अज्ञात महिलांनी मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या अभियंत्यांनी घाटकोपर विभागात ‘काम बंद’ आदोलन केले.
पूर्व उपनगरातील पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील काही अभियंते या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याच वेळी पालिका आयुक्त चेंबूर येथील पालिका कार्यलयात बैठकीत व्यग्र होते. मात्र या बैठकीलाही अभियंत्याची उपस्थिती तुरळकच होती. अखेर रात्री सीताराम कुंटे मारहाण केलेल्या दुय्यम अभियंत्याला पाहण्यासाठी राजावाडी रुग्णालयात गेले. त्यातच आमदार राम कदम यांनी पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध पालिकेच्या घाटकोपर विभाग कार्यालयाबाहेर फलकबाजी केल्यामुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले.
आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अभियंते मागणी करीत आहेत. परंतु प्रशासन कोणतीच पावले टाकत नसल्यामुळे अभियंते कमालीचे चिडले आहेत. आपण चर्चेतून मार्ग काढू, अशी त्यांची समजूत आयुक्तांनी काढली. मात्र अभियंते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे अखेर सीताराम कुंटे यांनी, वेळ पडली तर आमदार राम कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू, असे आश्वासन देऊन आपले हात झटकले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा