दसरा मेळाव्याला दोन दिवस शिल्लक असताना शिवसेनेच्या दोन गटात जुन्या भाषणांच्या चित्रफितीवरून जोरदार ‘प्रोमो वॉर’ सुरू आहे. विसर न व्हावा या शीर्षकांतर्गत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांचीच जुनी भाषणे ऐकवून शिवसेनेला काँग्रेसवर केलेल्या टीकेची आठवण करून दिली आहे. तर सेनेने निष्ठावंतांना साद घातली आहे.
हेही वाचा- Shinde vs Thackeray: शिंदेंच्या बंडानंतरची पहिली निवडणूक जाहीर, रंगणार नवा ‘सामना’, पण चिन्हाचं काय?
शिवसेनेच्या दोन गटात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळावा या विषयावरून अक्षरशः युद्ध सुरू आहे. आधी परवानगीवरून राजकारण, शह काटशह, मग न्यायालयीन लढाई हे सगळे झाल्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या जाहिरातीतून एकमेकांवर कुरघोडी सुरू आहेत.
शिवसेनेने सगळ्यात आधी मेळाव्याचे टिजर तयार करून त्यातून निष्ठावंतांना साद घातली होती. शिवाजी पार्क वरील मेळावा हा निष्ठावंतांचा मेळावा आणि बिकेसी वरील मेळावा हा गद्दारांचा मेळावा असे म्हणत शिंदे गटाला डिवचले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांचे शेवटच्या काळातील भाषणही या प्रोमोमध्ये वापरण्यात आले होते. उद्भवला सांभाळा, असे सांगणारी ही ध्वनीचित्रफीत शिवसैनिकांनी मोठया प्रमाणात प्रसारित केली. मात्र त्यानंतर शिंदे गटाकडून अशाच जुन्या भाषणाच्या चित्रफितीमधील मोजकीच वाक्ये घेऊन प्रोमोचा मारा सुरू झाला आहे.
विसर न व्हावा या शीर्षकांतर्गत ही जुनी भाषणे मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे. काही भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर, अजित पवारांवर टीका केलेली आहे. तर शिवसेनाप्रमुखांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर कसे आपल्या खास शैलीतून फटकारले होते त्याची आठवण करून देणाऱ्या चित्रफिती शिंदे गटाने आपल्या प्रोमोमध्ये वापरल्या आहेत. विचारांचा वारसा अशा शीर्षकाने शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.