लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) माध्यमातून काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी यासाठी डीएमईआरने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच समाज माध्यमांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. समाज माध्यमांवरून या उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी रुग्णालये आणि महाविद्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती संकलित करून समाज माध्यमांवर अधिकृत खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या माध्यमातून स्तन कर्करोग, मुख शुद्धीकरण व स्वच्छता, मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र, लठ्ठपणा, अवयवदान, रक्तदान, कंठग्रथी (थायरॉईड), ऑस्टेओपोरोसिस याबाबत आठ उपक्रम वर्षभरात राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे उपक्रम राबविण्यात येत असले तरी या उपक्रमांबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. त्यामुळे या उपक्रमांना नागरिकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेता हे सर्व उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने आता समाज माध्यमातून या उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समाजमाध्यमातून उपक्रमांची जास्तीत जास्त माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य सरकारने समाज माध्यमांवर अधिकृत खाते सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आणखी वाचा-सिद्धार्थ नगरमधील ६७२ राहिवाशांना थकीत घरभाडे देण्यास सुरुवात
तसेच या खात्यामध्ये राज्याच्या सर्व सरकारी महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांची माहिती जमा करण्यास सुरूवात केली आहे. त्यासंदर्भातील आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालये व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दिले आहेत. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम व मोबाईल क्रमांक घेण्यात येत आहे. ही माहिती जमा झाल्यानंतर समाज माध्यमाच्या सहाय्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या उपक्रमांची माहिती त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही माहिती त्यांच्या जवळील नातेवाईक, मित्रपरिवार, ते सहभागी असलेल्या विविध ग्रुपमध्ये पाठविण्यात येणार आहे.