मुंबई : रेरा कायदा राज्यात लागू झाल्यापासून, २०१७ पासून नवीन गृहप्रकल्पांना महारेरा नोंदणी बंधनकारक असून या नोंदणीशिवाय प्रकल्पाची जाहिरात करता येत नाही किंवा घरे विकता येत नाहीत, असे असताना मुंबईसह राज्यात महारेरा नोंदणी न करताच घरांची जाहिरात करून घरे विकली जात असल्याची धक्कादायक बाब महारेराच्या निदर्शनास आली आहे. असे करून विकासक रेरा कायद्याचे उल्लंघन करत आहेतच पण त्याचवेळी ग्राहकांची फसवणूकही करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याची गंभीर दखल घेऊन महारेराने स्वाधिकाराचा (सुमोटो) वापर करून आता अशा प्रकल्पांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि बांधकाम व्यवसायात पारदर्शकता यावी यासाठी रेरा कायदा आणण्यात आला. या कायद्यानुसार ५०० चौ मीटरपेक्षा जास्त किंवा आठ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प ( यात भुखंडांचाही समावेश आहे) असल्यास त्याची महारेरा  नोंदणी बंधनकारक आहे. महारेरा नोंदणी असेलच तर घरे विकता येतात किंवा प्रकल्पाची जाहिरात करता येते. या तरतुदींचे उल्लंघन केल्यास कायद्यात कडक कारवाईची तरतूद आहे. जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांक नमूद करणे ही बंधनकारक आहे.

हेही वाचा >>> धारावीमध्ये बहुमजली झोपड्यांना भीषण आग, पहाटे ४ वाजल्यापासून आग

असे असताना आजही अनेक प्रकल्पांच्या जाहिराती या महारेरा नोंदणीशिवाय केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्तमानपत्रात अशा जाहिराती प्रसिद्ध होत असून त्या जाहिरातींत केवळ ‘महारेरा नोंदणीकृत’ असा ढोबळ उल्लेख करण्यात येतो. पुण्यासह अन्य काही ठिकाणी असे प्रकार आढळून आले आहेत. याची आता महारेराने गंभीर दखल घेतली आहे.  स्वाधिकाराअंतर्गत अशा जाहिराती करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे महारेराने जाहीर केले आहे. या प्रकल्पांना नोटिसा बजावून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : पोलीस भरती चाचणीनंतर तरूणाचा मृत्यू

अशा प्रकल्पात घरे घेऊ नका

महारेरा नोंदणीशिवाय घरे विकणे आणि जाहिरात करणे बेकायदा असून ही ग्राहकांची फसवणूक  आहे. ग्राहकांनाही घर खरेदी करताना काळजी घ्यावी, रेरा नोंदणी आहे का याची पूर्णतः खात्री करूनच घर खरेदी करावे असे आवाहन महारेराकडून करण्यात आले आहे. ग्राहकांनी प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत आहे ना ? महारेराच्या  संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख दिलेली आहे ना ?  घर खरेदीकरार हा महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श घर खरेदी करारानुसारच आहे ना ?  १० टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी, घर नोंदणी करीत असल्यास विकासक घर विक्री  करार करतोय ना ? ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करताय ते मध्यस्थ महारेरांकडे नोंदणीकृत आहेत ना ? या सर्व बाबींची खात्री करून घ्यायला हवी. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचेही महारेराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promotion of projects maharera registration violation of rera act cheating of consumers mumbai print news ysh
Show comments