water supply complaints mumbai : यंदा चांगला पाऊस झाला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये आजमितीला ९३ टक्के पाणीसाठा आहे. मात्र सध्या काही निवडक ठिकाणांहून पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलवाहिन्यांतून होणारी गळती तातडीने शोधून काढावी, गळती शोधून काढण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा, विविध पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करावेत, पाणी गळती सापडल्यानंतर ती विनाविलंब दूर करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव सध्या काठोकाठ भरले आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी पाणी टंचाई आहे. पाण्याचा दाब कमी असल्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. विशेषत: मध्य मुंबईत वरळी, लोअर परळ, करीरोड या भागात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई आहे. त्यामुळे या परिसरातील आमदार आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारींवरून पालिका प्रशासनावर टीका केली होती. मुंबईत काही ठिकाणी पाणी कमी येत आहे, तर काही ठिकाणी दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांना याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचेही आवाहन ठाकरे यांनी केले होते. गगराणी यांनी शुक्रवारी जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांची एक बैठक पालिका मुख्यालयात घेतली होती. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

भांडुप संकुल व पिसे पांजरापूर संकुल जलप्रक्रिया केंद्रातील पाण्याची पातळी योग्य राखण्याबाबत पालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. संभाव्य गळती, पाण्याचा उपसा वाढणे आणि बेकायदेशीर मोटर पंपांचा वापर यासोबतच दूषित पाणीपुरवठ्याचा स्रोत शोधावा, या गोष्टींवर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचा उपसा जेवढा सुनिश्चित केला आहे, तेवढाच केला पाहिजे. पाण्याचा अतिरिक्त उपसा होणार नाही, याची दक्षता बाळगली पाहिजे. त्याचबरोबर ‘व्हॉल्व्ह ऑपरेशन’ वर संपूर्ण नियंत्रण ठेवून पाणीवाटप कोट्यानुसार संपूर्ण कार्यक्षेत्राला पाणीपुरवठा होतो की नाही यावरदेखील देखरेख ठेवावी. बेकायदेशीर मोटार पंप, अनधिकृत नळजोडण्या यांना आळा बसावा म्हणून पथके स्थापन करावी, अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करावेत, तसेच दंडात्मक कारवाई करावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले.

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक

पाणीपुरवठा तक्रारीसाठी मदतक्रमांक

पाणीपुरवठ्याविषयी लोकप्रतिनिधींकडून विविध सूचना, तक्रारी प्राप्त होताच त्याची तातडीने दखल घ्यावी. त्यांना त्वरित प्रतिसाद द्यावा. त्या तक्रारीची कार्यवाही विनाविलंब व्हावी, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींच्या निराकरणाबाबत त्वरित माहिती द्यावी, असेही गगराणी यांनी सांगितले. जल विभागातील दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता इत्यादींनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर उपस्थित रहावे. नागरिकांच्या घरात, परिसरात नळांना येणारे पाणी पुरेशा दाबाने, स्वच्छ येते का याची खातरजमा करावी, पाणीपुरवठा योग्य होत आहे की नाही याची नोंद घ्यावी. नागरिकांनी पाणीपुरवठाविषयक तक्रारींसाठी १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

हेही वाचा – मुंबईत पाच नवीन अग्निशमन केंद्रे बांधणार; कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूझ, चेंबूर, टिळक नगरची निवड

मध्य मुंबईत पाणी टंचाई

एफ दक्षिण विभागातील टी. जे. मार्ग, गाडी अड्डा, क्रीसेंट बे, जेरबाई वाडिया रस्ता, गं. द. आंबेकर मार्ग, भोईवाडा स्मशानभूमी, एफ उत्तर विभागातील जोगळेकर वाडी, जी दक्षिण विभागातील सेंच्युरी मिल म्हाडा कंपाऊंड, सीताराम जाधव मार्ग, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड याचबरोबर वांद्रे (पूर्व) येथील खारदांडा, आप्पा पाडा, क्रांती नगर, मालाड दिंडोशी, बोरिवली येथील राजेंद्र नगर आदी क्षेत्रात कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारींचा यावेळी क्षेत्रनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच दुय्यम अभियंता, सहायक अभियंत्यांना विचारणा करत तक्रारींचा जलद गतीने आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने निपटारा करावा, याबाबत निर्देश देण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promptly solve water supply complaints order of the commissioner of mumbai municipal corporation mumbai print news ssb