दहशतवाद आताच्या काळातील जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असून त्याला तोंड देण्यासाठी सरकार-प्रशासनातील सर्व विभागांमध्ये समन्वय अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सोमवारी केले.
युनिलिव्हर या विख्यात ब्रिटिश कंपनीची भारतातील शाखा असलेल्या ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’च्या कर्मचाऱ्यांशी कॅमेरून यांनी संवाद साधला. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
आज जगात देशांच्या अंतर्गत सुरक्षेसमोर दहशतवादाने मोठे आव्हान उभे केले आहे. आजच्या काळातील हा सर्वात जटिल प्रश्न आहे. त्यामुळे दहशतवादाला तोंड द्यायचे तर गृहमंत्रालय, गुप्तचर यंत्रणा, पोलिस दल इतकेच नव्हे तर परराष्ट्र खाते, लष्कर या साऱ्या सरकारी-प्रशासकीय यंत्रणांमुळे समन्वय अत्यावश्यक ठरतो. मुंबईवरील हल्ल्याचेही उदाहरण यात लक्षात घेता येईल, असे कॅमेरून म्हणाले. पूर्वीच्या काळातील कंपन्यांमधील उत्पादन खाते काय करत आहे हे विक्री विभागाला माहिती नसायचे, विक्री विभाग काय करीत आहे, हे संशोधन विभागाला माहिती नसायचे. अशा रीतीने सरकारी विभागांना एकमेकांचे काय चालले आहे ते समजले नाही तर आता ते चालणार नाही. दहशतवादाशी लढा द्यायचा तर सर्व विभागांचा परस्परांशी संवाद, समन्वय अत्यावश्यक ठरतो, असे कॅमेरून यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा