टाटा रुग्णालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मदतीने उपचारांची नियमावली

शैलजा तिवले, मुंबई</strong>

‘महात्मा फुले जनआरोग्य’ आणि ‘आयुष्मान’ योजनेअंतर्गत आता कर्करोगावर योग्य उपचार मिळण्याची शाश्वती मिळणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या मदतीने मार्गदर्शक तत्त्वांची नियमावली तयार केली आहे. ही नियमावली या योजनेत सहभागी असलेल्या सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. या आजारामध्ये उपचार होत असले तरी उपचारांबाबत रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये साशंकता असते. कर्करोगाच्या दर्जेदार आणि किफायतशीर उपचारांसाठी टाटा मेमोरिअल रुग्णालय प्रसिद्ध आहे. त्यामुळे बऱ्याचदा टाटा मेमोरियल रुग्णालयामध्येच उपचार करण्यासाठी धाव घेतली जाते. काही रुग्ण खासगी किंवा अन्य सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असले तरी योग्य पद्धतीने उपचार केले जात आहेत का याची खात्री करून घेण्यासाठी नातेवाईक टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना भेटण्यासाठी धडपडत असतात.

रुग्ण आणि नातेवाईकांची मानसिकता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या मदतीने कर्करोगाच्या उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांची नियमावली तयार केली आहे. एखाद्या अवयवाला कर्करोगाची बाधा झाल्यानंतर उपचाराची पद्धती कशी असावी. केमोथेरपी, शस्त्रकिया किंवा रेडिओ थेरपी या उपचार पद्धतींचा अवलंब कोणत्या प्रकारच्या आजारांमध्ये कशा रीतीने करावा, हे या नियमावलीमध्ये स्पष्ट केले आहे. या नियमावलीचे सॉफ्टवेअर विभागाने तयार केले असून लवकरच ते योजनेत सहभागी असलेल्या रुग्णालयांना पुरविले जाईल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विमा योजनेमध्ये कर्करोगावरील उपचारांचा समावेश आहे. मात्र काही रुग्णालये याचा गैरफायदा घेऊन अवाच्या सव्वा बिले करून दीड लाखांपर्यंतच्या उपचाराच्या रकमेचे दावे करतात. यामध्ये अनावश्यक उपचार केल्याचेही दाव्यांमधून आढळून आले आहे. रुग्णालयाकडून रुग्णांची अशा रीतीने केल्या जाणाऱ्या फसवणुकीला चाप बसविण्यासाठी या सॉफ्टवेअरची मदत होणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मार्गदर्शक तत्त्वानुसारच उपचार देणे बंधनकारक!

कर्करोगाच्या रुग्णाच्या उपचारासाठी दावे आल्यानंतर या मार्गदर्शक  तत्त्वानुसार उपचार दिले जात आहेत का याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच या दाव्यांना अनुमती दिली जाईल. बदलत्या काळानुसार या टाटा रुग्णालयाच्या मदतीने यामध्ये बदल केले जाणार आहेत. तसेच काही रुग्णांमध्ये या नियमावलीमध्ये बसणारी उपचार पद्धती न देता अन्य पद्धतीने उपचार देण्याची आवश्यकता भासल्यास रुग्णालयांनी हमी सोसायटीला कळवावी आणि याबाबत स्वतंत्रपणे टाटा रुग्णालयाचा सल्ला घेऊन उपचारांची योग्य दिशा ठरवण्याचा मार्गही खुला असल्याचे राज्य हमी सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जागतिक आरोग्य   संघटनेने या बाबतची नियमावली जाहीर केली असली तरी सर्व रुग्णालये या नियमावलींचे पालन करत नाहीत. तेव्हा सर्व रुग्णालयांच्या उपचारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी या सॉफ्टवेअरचा फायदा होईल.

– डॉ. सुधाकर शिंदे , राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Story img Loader