सात हजार कोटींचे लक्ष्य गाठणे अवघड
इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीचे केवळ ५४ टक्के लक्ष्य गाठण्यात पालिकेला यश आले आहे. चालू आर्थिक वर्षांत पालिकेने मालमत्ता कर वसुलीतून सात हजार कोटी रुपये उत्पन्न अंदाजित केले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत वेगाने कर वसुली होत असली तरी कर फेररचना यावर्षी होऊच न शकल्यामुळे हे लक्ष्य गाठणे कर निर्धारण व संकलन विभागाला मुश्कील होणार आहे. जानेवारीअखेपर्यंत ३८०० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे.
मालमत्ता करातून पालिकेला दरवर्षी साधारण पाच ते सहा हजार कोटी रुपये उत्पन्न मिळत असते. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागलेले असते. मार्च अखेपर्यंत मालमत्ता कर वसुली होत असते. गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजेच २०२०-२१ मध्ये पालिकेने अर्थसंकल्पात सहा हजार ७६८ कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले होते. मात्र टाळेबंदीमुळे नागरिकांच्या उत्पन्न बुडाल्याने व विविध सवलती दिल्याने पालिकेने अर्थसंकल्पाच्या सुधारित अंदाजात वसुलीचे लक्ष्य पाच हजार २०० कोटींवर आणले होते. तर आर्थिक वर्ष संपेपर्यत पालिकेला पाच हजार १३५.४३ कोटी रुपये म्हणजेच ९८ टक्के वसुली करणे शक्य झाले होते. ही पालिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक वसुली होती. त्याआधीच्या वर्षांत म्हणजेच मार्च २०२० मध्ये पालिकेने चार हजार १६१ कोटी रुपये वसूले केले होते.
मालमत्ता कराच्या कररचनेत दर पाच वर्षांनी बदल करून भांडवली मूल्यामध्ये सुधारणा केली जाते. २०२०-२१ मध्ये ही सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असल्यामुळे आर्थिक भार कमी करण्यासाठी ही सुधारणा पालिकेने २०२१-२२ मध्ये करण्याचे ठरवले होते. ही सुधारणा झाल्यास चालू आर्थिक वर्षांत सात हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुली होईल असा अंदाज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्पात व्यक्त केला होता. त्यानुसार जून २०२१ मध्ये पालिकेच्या करनिर्धारण विभागाने करवाढीचा प्रस्तावही आणला होता. २०२१ च्या रेडिरेकनर दरानुसार सुधारित कर लागू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. यामुळे मालमत्ता करात १४ टक्के वाढ होण्याची शक्यता होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला होता. त्यामुळे यावर्षीही जेमतेम पाच ते सहा हजार कोटी रुपयांचेच लक्ष्य गाठणे पालिकेला शक्य होणार आहे.
कर वसुलीसाठी आस्ते कदम
- मालमत्ता कर वसुली वाढवण्यासाठी दरवर्षी पालिका आर्थिक वर्षांच्या अखेरीस मालमत्ताधारकांच्या मागे लागते. नोटीसा धाडणे, ध्वनीक्षेपकांवरून आवाहन करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मालमत्तांवर जप्ती आणणे अशी कारवाईही केली जाते. यावर्षी निवडणुकीमुळे मतदारांचा रोष परवडणारा नसल्यामुळे पालिका मालमत्ता कर वसुलीसाठी सावध पावले उचलण्याची शक्यता आहे.
- पालिकेने ३० जानेवारीपर्यंत तीन हजार ८४७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत पालिकेने केवळ एक हजार ४०४ कोटी रुपये वसुली केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी तब्बल १७४ टक्के अधिक वसुली झाली आहे. मात्र, कर वसुलीचे ध्येय पाहता आता झालेली वसुली ही केवळ ५४ टक्के आहे.
- दरम्यान, मालमत्ता कर हा मार्च अखेपर्यंत भरता येत असल्यामुळे अनेक नागरिक हे शेवटच्या दिवसापर्यंत मालमत्ता करभरणा करीत असतात. त्यामुळे आम्ही हे लक्ष्य गाठू असा विश्वास करनिर्धारण व संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी व्यक्त केला आहे.