मुंबई : महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असताना मालमत्ता कराने यंदा पालिकेच्या उत्पन्नात थोडी भर घातल्याचे चित्र आहे. चालू अर्थसंकल्पातील मालमत्ता कराच्या उद्दिष्टात १२५० कोटींनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ४९५० वरून ६२०० कोटींपर्यंत सुधारित करण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी आतापर्यंत ४६५३ म्हणजेच ७५ टक्के मालमत्ता कर वसुली करण्यात पालिकेच्या कर संकलन विभागाला यश मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेचा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. मालमत्ता कराच्या दरात २०२० मध्ये सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना व टाळेबंदी आणि राजकीय विरोध यामुळे ही सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घटच होत गेली. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या मालमत्ता करप्रणालीतील तीन नियम नव्याने तयार करण्यास सांगितल्यामुळे यंदाही मालमत्ता कराच्या दरात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने चालू अर्थसंकल्पात मालमत्ता करातून ४९५० कोटींचे उत्पन्नच मिळेल, असे गृहित धरले होते.

मात्र, यंदा पालिकेच्या करनिर्धारण विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी मोठी मोहीम हाती घेतली असून त्याला चांगले यश आले आहे. पालिकेने यंदा डिसेंबर महिन्यातच चार हजार कोटींची वसुली केली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सुधारित करताना मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न सुधारित करण्यात आले आहे. मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात १२५० कोटींची वाढ झाली असून ६२०० कोटींची मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली.

विभागस्तरावर बैठका

जानेवारी अखेर ४६५३ कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला असून हा सुधारित उद्दिष्टाच्या ७५ टक्के इतका आहे. ६२०० कोटींचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विभागस्तरावर बैठका घेतल्या जात असून कर संकलन करणाऱ्या पथकांना मार्गदर्शन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अजून आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असून या कालावधीत हे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या दोन आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे उद्दिष्ट कमी करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. यंदा मात्र मालमत्ता कराच्या उद्दिष्टात वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांतील मालमत्ता करातील उत्पन्न

२०२१-२२ ५७९१ कोटी

२०२२-२३ ५५७५ कोटी

२०२३-२४ ४८५९ कोटी २०२४-२५ ४६५३ कोटी (जानेवारी अखेरपर्यंत)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Property tax target in the current bmc budget increased by rs 1250 crore zws