वर्सोवा येथील आमदारांच्या राजयोग सोसायटीच्या एका सदनिकेमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने उघडकीस आणला. सोमवारी रात्री पोलिसांनी येथील आमदाराच्या मालकीच्या असलेल्या एका सदनिकेमध्ये छापा घालून पाच तरुणींची सुटका केली. यावेळी पोलिसांनी एका महिला दलालासह दोघांना अटक केली.
वर्सोवा येथील न्यू म्हाडा वसाहतीत पाच इमारती आहेत. त्यातील सदनिका आमदारांना देण्यात आल्या आहेत. यापैकी इमारत क्रमांक दोनमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०२ मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना सापळा रचून बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री केली आणि सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छापा घातला. यावेळी महिला दलाल प्रिया ठाकूर (३५) आणि सतीश शहा (३५) या दोघांना अटक करून पाच तरुणींची सुटका केली. या तरुणी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अतिरिक्त अभिनेत्री म्हणून काम करतात.
ही सदनिका आमदारांच्या कोटय़ातील असल्याचे समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज पटेल यांनी सांगितले. ही सदनिका नाशिकच्या एका आमदाराची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वर्सोवा पोलीस करीत आहेत. या ठिकाणी यापूर्वीही वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले होते.

Story img Loader