पावसाळय़ानंतर उभारणी; पर्यावरणवाद्यांना मात्र ‘सीआरझेड’ नियमांचा भंग होण्याची भीती
मुंबईतील खारफुटीवर नियमित होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी खारफुटी संरक्षक विभागाने वारंवार अतिक्रमणे होणाऱ्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूननंतर या कामाला सुरुवात होणार असून तोडण्यात आलेल्या खारफुटींच्या जागी पुन्हा नव्या लागवडी करण्यात येणार असल्याचे मुख्य वन संरक्षकांनी सांगितले. मात्र, अतिक्रमणे रोखण्यासाठी भिंत बांधल्यास किनारा नियमन प्राधिकरणाच्या नियमांचा भंग होण्याची शक्यता असून भिंतीमुळे अतिक्रमणे कितपत रोखली जातील याबाबत पर्यावरणवाद्यांना शंका आहे.
मुंबई शहराच्या किनारी भागात असलेल्या खारफुटीवरील (कांदळवन) अतिक्रमणे कमी मनुष्यबळ व संसाधनांअभावी रोखण्यात अपयशी ठरलेल्या संरक्षक विभागाने आता अतिक्रमणे होणाऱ्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील कुलाबा, चित्ता कॅम्प, मालवणी, चिकूवाडी, चारकोप, शंकरवाडी, वडाळा, मंडाले, गोवंडी या भागांत खारफुटीवर वारंवार झोपडय़ांचे अतिक्रमण होण्याच्या घटना घडत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे या झोपडय़ांवर कारवाई करण्यास अडचणीही येत आहेत. त्यामुळे ज्या भागात वारंवार अतिक्रमणे होतात, तेथे खारफुटींची हद्द संपताच संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून मान्सूननंतर हे काम सुरू करणार असल्याचे खारफुटी विभागाचे मुख्य वन संरक्षक एन. वासुदेवन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा