मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील ३० वर्षे जुन्या प्रार्थना स्थळावरवर महानगरपालिकेने बुधवारी तोडक कारवाई केली. या कारवाईच्या निषेधार्थ विशिष्ठ समाजातील नागरिकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनकरर्त्यांनी पालिकेविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी के-पूर्वी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

विलेपार्ले येथील एका इमारतीच्या वाहनतळाच्या जागेत हे प्रार्थना स्थळ होते. त्या जागेबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. याप्रकरणी न्यायालयीन लढा देखील सुरू होता. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच महापालिकेने विलेपार्ले येथील या प्रार्थना स्थळावर १६ एप्रिल रोजी तोडक कारवाई केली. या कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी विलेपार्ले परिसरात मोर्चा काढण्यात आला होता. विलेपार्ले पूर्व स्थानक परिसरापासून पालिकेच्या के-पूर्व विभाग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्च्यात सहभागी झालेल्या नागरिकांनी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महापालिकेतर्फे कारवाई करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, महानगरपालिकेने स्वखर्चातून पाडकाम केलेले प्रार्थना स्थळ बांधून द्यावे, तसेच, या घटनेबद्दल पालिकेने जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड, आमदार पराग अलवाणी यांच्यासह राजकीय पक्षांतील अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या कारवाईविरोधात टीका केली आणि निषेध व्यक्त केला.

संबंधित प्रार्थना स्थळ पाडण्यासाठी महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. काही नागरिकांनी या नोटिसीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने या नागरिकांची याचिका फेटाळली. त्यानंतर संबंधित नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाचा आदेश येण्यापूर्वीच महानगरपालिका प्रशासनाने हे प्रार्थना स्थळ पाडले, असा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, या आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिकेच्या के-पूर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत घडगे नुकतेच रूजू झाले आहेत.